बंगळुरू: कर्णधार गौतम गंभीरनं 19 चेंडूंत नाबाद 32 धावांची खेळी करुन, आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याला हैदराबादवर सात विकेट्सनी विजय मिळवून दिला.
या विजयासह कोलकात्यानं क्वालिफायर टूचं तिकीट मिळवलं असून, त्यात कोलकात्याचा मुकाबला मुंबईशी होईल.
दरम्यान, बंगळुरुतल्या सामन्यात कोलकात्यानं हैदराबादला 20 षटकांत सात बाद 128 धावांत रोखलं होतं. पण त्यानंतर आलेल्या पावसामुळं कोलकात्याच्या डावातल्या षटकांची संख्या कमी करावी लागली.
कोलकात्याला सहा षटकांत 48 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण ख्रिस लिन, युसूफ पठाण आणि रॉबिन उथप्पा स्वस्तात माघारी परतल्यानं कोलकात्याची 3 बाद 12 अशी बिकट अवस्था झाली होती.
त्या परिस्थितीत गौतम गंभीरनं इशांक जग्गीच्या साथीनं 36 धावांची अभेद्य भागीदारी रचून कोलकात्याला विजय आणि क्वालिफायर टूचं तिकीट मिळवून दिलं.
आता क्वालिफायर टूमध्ये कोलकात्याचा सामना मुंबई इंडियन्सशी उद्या 19 मे रोजी बंगळुरुत होणार आहे.