IPL Auction 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी लिलाव प्रक्रिया आज चेन्नईत पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता ऑक्शन सुरु होईल. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये 292 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त 61 खेळाडूंनाच करारबद्ध केलं जाणार आहे. IPL 2021 मध्ये 1114 खेळाडूंनी स्वारस्य दाखवलं होतं. दरम्यान, या खेळाडूंपैकी 164 खेळाडू हे भारतीय आहेत. तर, परदेशी खेळाडूंचा आकडा 125 इतका आहे. 3 खेळाडू आयसीसीशी संलग्न राष्ट्रांतील असल्याची माहिती आहे. या लिलावात तीन खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या तिघांना खरेदी करण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होऊ शकते.
1- डेविड मलान
आयसीसी टी20 इंटरनेशनल रॅंकिंगमध्ये जगात नंबर वन असलेला फलंदाज डेविड मलानवर पैशांची बरसात होऊ शकते. मलानची बेस प्राईज दीड करोड रुपये आहे. टी 20 मध्ये मलानचं प्रदर्शन जबरदस्त राहिलेलं आहे. मलाननं इंग्लंडकडून खेळताना 19 टी20 सामन्यात 53.44 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 855 धावा बनवल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
IPL Auction 2021 live streaming | जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल आयपीएलचा लिलाव
2- ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा धाकड खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडेही सर्वांचं लक्ष असेल. मागील 2020 च्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलचं प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं होतं. एकही षटकार त्यानं लावला नव्हता. यानंतर आयपीएल 2021 साठी किंग्स इलेवन पंजाबने त्याला रिलिज केलं आहे. आता आयपीएल भारतात होणार आहे. अशात ग्लेन मॅक्सवेलवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज दोन करोड रुपये आहे.
3- स्टीव्ह स्मिथ
राजस्थान रॉयल्सने आपला कर्णधार स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावाआधी रिलिज केलं आहे. स्टीव्ह स्मिथनं आयपीएल 2020 च्या 14 सामन्यांमध्ये 311 धावा केल्या होत्या. .त्यानंतरही स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावात सर्वाधिक रक्कर मिळू शकते. आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथचं करिअर जबरदस्त राहिलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 95 सामन्यात 35.34 च्या सरासरीनं 2333 धावा केल्या आहेत.
IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...
या खेळाडूंकडेही लक्ष
आयपीएलच्या या लिलावात भारताच्या हरभजन सिंग आणि केदार जाधव यांच्यासह अकरा परदेशी शिलेदारांना मोठा भाव येण्याची शक्यता आहे. हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून पुन्हा लिलावासाठी मोकळं केलं आहे. त्या दोघांसह अकरा परदेशी शिलेदारांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.