IPL Auction 2019 : वरुण चक्रवर्तीची 8.4 कोटी रुपयांमध्ये विक्री
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2018 07:13 PM (IST)
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघमालकांनी वरुण चक्रवर्ती या नवोदित खेळाडूवर तब्बल 8.40 कोटी रुपये इतकी मोठी बोली लावून त्याचा स्वतःच्या संघात समावेश केला आहे.
जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी जयपूर येथे खेळाडूंचा आज (18 डिसेंबर) लिलाव सुरु आहे. आजच्या लिलावात आतापर्यंत सर्वात जास्त बोली वरुण चक्रवर्ती या खेळाडूवर लागली. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघमालकांनी या नवोदित खेळाडूवर तब्बल 8.40 कोटी रुपये इतकी मोठी बोली लावून त्याचा स्वतःच्या संघात समावेश केला आहे. आयपीएलच्या 12 व्या सीझनच्या लिलावात एकूण 350 खेळाडूंचा समावेश असून त्यात 228 भारतीय आणि 133 परदेशी आहेत. जयपूरमध्ये आज या खेळाडूंवर आयपीएलच्या 8 फ्रॅन्चायजी बोली लावत आहेत. वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूची बेस प्राइस केवळ 20 लाख रुपये होती. त्याच्या बेस प्राइसपेक्षा 42 पटीने अधिक किंमत त्याला मिळाली आहे. तमिळनाडूच्या या मिस्ट्री स्पिनरने स्थानिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तमिळनाडू प्रिमियर लीगमध्ये त्याने 9 सामन्यांमध्ये 22 बळी घेतले आहेत. विजय हजारे चषक स्पर्धेत 4.7 इकोनॉमी रेटने 9 बळी घेतले आहेत.