जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी खेळाडूंचा आज (18 डिसेंबर) लिलाव होणार आहे. आयपीएलच्या 12 सीझनच्या या लिलावात एकूण 350 क्रिकेटरचा समावेश असून त्यात 228 भारतीय आणि 133 परदेशी आहेत. जयपूरमध्ये आज या खेळाडूंवर आयपीएलच्या 8 फ्रॅन्चायजी बोली लावतील.


एका वर्षात दुसरा लिलाव
आयपीएलसाठी यंदाच्या वर्षातील हा दुसरा लिलाव आहे. याआधी जानेवारीमध्ये 2018 साठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. आयपीएलसाठी लिलाव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण पुढच्या वर्षी होणारा वन डे विश्वचषक आणि भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मार्च महिन्यातच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रेन्चायझींना तयारी करण्यासाठी कमी वेळ मिळेल. त्यासाठी लिलाव लवकर केला जात आहे.

सुरुवातीला एकूण 1003 खेळाडूंनी लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 346 खेळाडूंची निवड करण्यात आली. आणखी चार नावं शेवटी जोडल्याने खेळाडूंची संख्या 350 झाली आहे.

इंग्लंडचा इयान मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा रिली मेरेडिथी, आणखी दोन अनकॅप्ड भारतीयांमध्ये मयांक डागर आणि प्रणव गुप्ता यांचा यादीत नंतर समावेश करण्यात आला. या लिलावात 119 कॅप्ड, 229 अनकॅप्ड आणि 2 असोसिएट नेशनच्या खेळाडूंवर बोली लागेल.

रिचर्ड यांच्या जागी अॅडमिडेस
नव्या शहरात लिलावासह यंदा नवे संचालकही दिसतील. आयपीएल लिलावाचं नियमित स्वरुपात संचालन करणारे रिचर्ड मेडले यंदा आयपीएलचा भाग नसतील. त्यामुळे लिलावाची जबबादारी ह्यू अॅडमिडेस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


कोणत्याही भारतीय खेळाडूची बेस प्राईज दोन कोटी नाही!
या लिलावात कोणत्याही भारतीय खेळाडूने त्याची बेस प्राईज दोन कोटी ठेवलेली नाही. दो कोटींच्या बेस प्राईजवर यंदा सर्वच (9) परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. शेवटच्या क्षणी मॉर्गन सामील झाल्याने ही संख्या 10 झाली आहे. यामध्ये इंग्लंडचा सॅम कुर्रन, ख्रिस वोक्स, दक्षिण अफ्रिकेचा कॉलिन इंग्राम, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आणि लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आणि डार्सी शॉट, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम आणि कोरी अँडरसन यांचा समावेश आहे.

काय, कधी कुठे?

काय : आयपीएल 2019 लिलाव
कधी : 18 डिसेंबर, 2018
कुठे : जयपूर
केव्हा : दुपारी 3 वाजता (भारतीय वेळेनुसार)

कोणत्या संघाकडे किती पैसा?

कोलकाता नाईट रायडर्स - (12 खेळाडूंची जागा रिकामी - 7 भारतीय, 5 परदेशी) - 15.20 कोटी

किंग्ज इलेव्हन पंजाब - (15 खेळांडूची जागा रिकामी - 11 भारतीय, 4 परदेशी) - 36.20 कोटी

दिल्ली कॅपिटल्स - (10 खेळाडूंची जागा रिकामी- 7 भारतीय, 3 परदेशी) - 25.50 कोटी

रॉयल चॅलेंजर बंगलोर - (10 खेळाडूंची जागा रिकामी - 8 भारतीय, 2 परदेशी) - 18.15 कोटी

मुंबई इंडियन्स - (7 खेळाडूंची जागा रिकामी - 6 भारतीय, 1 परदेशी) - 11.15 कोटी

राजस्थान रॉयल्स - (9 खेळाडूंची जागा रिकामी - 6 भारतीय, 3 परदेशी) - 20.95 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज - (2 खेळाडूंची जागा रिकामी- 2 भारतीय, 0 परदेशी) - 8.40 कोटी

सनरायझर्स हैदराबाद - (5 खेळाडूंची जागा रिकामी- 3 भारतीय, 2 परदेशी) - 9.70 कोटी