औरंगाबाद : औरंगाबादमधील सिडको पोलिसांनी एमजीएम मेडिकल कॉलेजच्या आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा सात दिवसात छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या मजुराला अटक केली आहे. राहुल शर्मा असं आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील दुद्धी सोनभद्रा इथला रहिवासी आहे.

चोरीसाठी आलेल्या मजुराकडून आकांक्षाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. चोरी करण्यासाठी पत्रा तोडून हॉस्टेलमध्ये घुसलेल्या बांधकाम मजुरानेच आकांक्षाचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे.

आकांक्षाची हत्या झाल्याचं उलगडायला 24 तास का लागले?

एमजीएम हॉस्टेलजवळच आणखी एका वसतिगृहाचं बांधकाम सुरु आहे. तिथेच आरोपी राहुल शर्मा बऱ्याच दिवसांपासून काम करत होता. पोलिसांनी सांगितलं की, 10 डिसेंबरला आकांक्षा रात्री साडेअकरा वाजता रुममध्ये आली. त्यानंतर एकच्या सुमारास शर्मा चोरीच्या उद्देशाने बाजूच्या बांधकामाचा पत्रा उचकटून हॉस्टेलमध्ये घुसला. त्याने चोरीचा प्रयत्न केल्यावर आकांक्षाने विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, आकांक्षाचा विरोध वाढल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि गळ्यातील सोन्याची साखळी तोडून पळाला.

औरंगाबादमध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या

त्यानंतर तीन वाजता राहुल शर्मा एमजीएम परिसरातीलच त्याच्या घरी गेला. तिथून पाच वाजता रेल्वेने तो उत्तर प्रदेशात पसार झाला.

पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास केला. सुरुवातीला तिथल्या मजुरांची यादी पोलिसांनी घेतली. त्यातले काही मजूर बेपत्ता आहेत का हे देखील तपासलं. त्यामुळे राहुल शर्मा बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन काल रात्री दोनच्या सुमारास वसतिगृहात आणलं. इथे त्याने आकांक्षाची हत्या कशाप्रकारे केली याची कबुली दिली.

काय आहे प्रकरण?

औरंगाबादमध्ये 10 डिसेंबरला हॉस्टेलमध्ये आकांक्षाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला आकांक्षा देशमुखने आत्महत्या केल्याचं वाटत असतानाच तिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं. बीडच्या माजलगावात राहणारी ही तरुणी फिजिओथेरपिस्ट होण्याचं स्वप्न घेऊन औरंगाबदच्या एमजीएम महाविद्यालयात आली.