नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने रणनिती बनवणं सुरु केलं आहे. केवळ अक्षर पटेलला रिटेन करत पंजाबने लिलावात मोठा धमाका करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावात 578 खेळाडूंचा लिलाव होणार आहे.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पंजाबच्या धोरणावर बोलताना सांगितलं की, ''आमची नजर सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या ऑलराऊंडर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यावर असेल. हे दोन्ही खेळाडू संघात आल्याने संघाची लोकप्रियता आणखी वाढेल''.

पंजाबचे स्टार असलेल्या युवराज आणि हरभजनला संघात पाहणं चाहते पसंत करतील, असं सेहवाग म्हणाला. दरम्यान, आशिष नेहरा वयाच्या 36 व्या वर्षी संघात पुनरागमन करु शकतो, तर युवराज का नाही, असंही सेहवागने युवीच्या पुनरागमनावर बोलताना सांगितलं. तो अजूनही एक अद्भूत खेळाडू असून त्याचं टॅलेंट कायम आहे, असं तो म्हणाला.

युवराज आतापर्यंत आयपीएलच्या पाच संघांकडून खेळला आहे. 2014 च्या लिलावात 14 कोटींसह तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला खरेदी केलं होतं. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 120 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 2587 धावा आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युवराज फॉर्मात नसल्याने तो भारतीय संघाबाहेर आहे. फिटनेससाठीही तो मेहनत घेत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात युवराजची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तो त्याच्या होम टीममध्ये जातो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे हरभजन सिंह मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पंजाब संघासोबत त्याच्या जुन्या आठवणीही जोडलेल्या आहेत. पहिल्याच मोसमात पंजाबकडून खेळणाऱ्या हरभजनने एस. श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती.