अलाहाबाद : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडियांना पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने विहिंपच्या मार्गदर्शक मंडळातील एका वरिष्ठ सदस्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.


केंद्र आणि राजस्थान सरकारवर केलेल्या टीकेमुळे प्रवीण तोगडियांना विहिंपच्या कार्याध्यक्ष पदावरुन दूर केलं जाण्याची शक्यता असल्याचे, या वरिष्ठ सदस्याने सांगितलं. पण दुसरीकडे संत संमेलनात सहभागी होण्यासाठी अलाहाबादमध्ये उपस्थित असलेल्या अनेक विहिंप नेत्यांनी तोगडियांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रवीण तोगडिया जवळपास 12 तास बेपत्ता होते. यानंतर ते अहमदाबादच्या शाही बाग परिसरात बेशुद्धीच्या अवस्थेत सापडले. शुद्धीवर आल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेत, आपला एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला होता.

याच घटनेची गांभीर्याने दखल घेत, तोगडियांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे विहिंप नेते स्वामी चिन्मयानंद यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं. विशेष म्हणजे, त्यामुळे त्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असंही चिन्मयानंदांनी स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे, केंद्र आणि तोगडिया यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्याने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून, त्यांचं महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा माध्यमांतून सुरु आहे. त्यातच विहिंपच्या मार्गदर्शक मंडळाच्या सदस्याने तोगडियांवर शिस्तभंगाची कारवाई होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं.

“तोगडियांनी विहिंपमधील आपलं स्थान गमावलं आहे. त्यांचं महत्त्व कमी केल्यास, संघटनेतील अनेकांना आनंद होईल. नुकतंच त्यांनी जे काही केलं आहे, त्यातून त्यांनी शिस्तभंग केलेला आहे. विहिंपमध्ये त्यांची ही कृती सहन केली जाऊ शकत नाही. आता तोगडियांचा विहिंपशी काहीही संबंध नाही.” असं चिन्मयानंदांनी सांगितलं.

तर विहिंपचे महासचिव चंपत राय यांच्या मते, “प्रवीण तोगडिया आमचे आणि समाजाचे अतिशय प्रिय व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.” असं म्हटलं आहे.

दरम्यान, प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यध्यक्ष असून, पेशाने कॅन्सर सर्जन आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. तर वयाच्या 22 व्या वर्षी तोगडियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य मार्गदर्शक मंडळात निवडण्यात आलं. वयाच्या 27 व्या वर्षी ते विश्व हिंदू परिषदेशी जोडले गेले, त्यावेळी त्यांच्यावर उद्ध्वस्त सोमनाथ मंदिराची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर ते पूर्णपणे हिंदुत्वासाठी काम करु लागले. मुस्लीम समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्याद्वारे ते नेहमी चर्चेत राहतात.

संबंधित बातम्या

माझा एन्काउंटर करण्याचा कट, प्रवीण तोगडिया ढसाढसा रडले

बेपत्ता प्रवीण तोगडिया बेशुद्धावस्थेत, अहमदाबादेत उपचार सुरु

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बेपत्ता, कार्यकर्ते आक्रमक