IPL 2023 Final, CSK vs GT : इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाची महाअंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात रविवारी होणार होता. पण, पावसामुळे 28 मे रोजी हा सामना स्थगित करण्यात आला. आता आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये सोमवारी, 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. रविवारी अंतिम सामनाच्या नाणेफेक आधीच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची उघड-झाप सुरु होती.
सोमवारी रंगणार आयपीएलचा महाअंतिम सामना
अहमदाबादमध्ये रविवारी रात्री 11 च्या सुमारास पावसानं थोडी उसंत घेतली. मात्र, मैदानात पाणी भरल्यामुळे हा सामना अखेर स्थगित करण्यात आला. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील प्रेक्षकांची निराशा झाली. सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांना पावसामुळे माघारी परतावं लागलं आणि त्यांचा हिरमोड झाला. रविवारी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. अंतिम सामना पुढे ढकलल्यानंतर हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलने चाहत्यांसाठी खास पोस्ट केली.
पांड्या आणि गिलचं चाहत्यांसाठी खास ट्विट
हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलने ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्वीट करत म्हटलं आहे की, ''दुर्दैवाने आज सामना होऊ शकला नाही, पण उद्याची वाट पाहूया. लवकरच भेटू.'' शुभमन गिलने ट्वीट करत लिहीलं की, ''पाऊस असूनही आम्हाला साथ दिल्याबद्दल चाहत्यांचे खूप खूप आभार. कृपया तुमचं तिकीट सुरक्षित ठेवा. त्यामुळे उद्याचा सामना पाहता येईल.''
रविवारच्या तिकीटावर सोमवारी सामना पाहता येणार
रविवारचा अंतिम सामना स्थगित करण्यात आल्यानंतर हा सामना सोमवारी खेळवण्यात येणार आहे. प्रेक्षकांना रविवारच्या सामन्याच्या तिकीटावरच सोमवारी सामना पाहता येणार आहे. आयपीएलनेही प्रेक्षकांना तिकिटांबाबत आवाहन केले आहे. आयपीएलने ट्विट करत सांगितलं आहे की, प्रेक्षकांनी त्यांची तिकिटे सुरक्षित ठेवावीत. त्यामुळे सोमवारीही सामना पाहता येईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारो प्रेक्षक पोहोचले होते. पण पावसामुळे हा सामना होऊ शकले नाही. आता हा सामना सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता अंतिम सामना खेळवला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारीही अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे.
CSK vs GT IPL 2023 Final : गुजरात विरुद्ध चेन्नई महामुकाबला
गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.