Virat Kohli Records : बंगळुरुनं काल राजस्थानचा धुव्वा उडवत मोठा विजय साकारला. या सामन्याचा हिरो शतकवीर देवदत्त पडिक्कल ठरला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या खेळीनंही अनेक विक्रम रचले. विराटनं कालच्या सामन्या 47 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. राजस्थान विरुद्धच्या या सामन्यात 51 धावा केल्यानंतर त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 196 सामन्यात हा विक्रम केला आहे.
विराटनं हा विक्रम करताना 5 शतकं आणि 40 अर्धशतकं ठोकली आहे. विराटनं आतापर्यंत 196 सामन्यात 6 हजार 21 धावा केल्या आहेत. कोहलीने 38.35 च्या सरासरीने आणि 130.69 स्ट्राइक रेटने या धावा केल्यात. विराटनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाने 197 सामन्यात 5 हजार 448 धावा केल्या आहेत.
सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात आधी 5 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र तो गेल्या आयपीएल स्पर्धेत खेळला नव्हता. शिखर धवन या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. शिखर धवननं 5 हजार 428 धावा केल्या आहेत. तर हैदराबादचा डेविड वॉर्नर 5 हजार 384 धावा करुन चौथ्या नंबरवर आहे. तर रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर असून त्यानं 5 हजार 368 धावा केल्या आहेत.