Delhi Capitals vs Rajasthan Royals: अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 (IPL) व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला.  या विजयासह दिल्लीने 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे तर राजस्थानच्या अडचणी वाढल्या आहेत. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) देखील मोठा झटका बसला आहे. कर्णधार संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेट अर्थात धिम्या पद्धतीनं षटकं टाकल्यामुळं तब्बल 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय संजूवर एका सामन्याच्या बंदीची देखील शक्यता आहे.  


कर्णधार संजू सॅमसन शिवाय राजस्थानच्या सर्व खेळाडूंवरही दिल्लीविरुद्धच्या सामन्यात  स्लो ओव्हर रेटमुळं दंड आकारण्यात आला आहे. सॅमसनवर 24 लाखांचा तर अन्य प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूंना प्रत्येकी  सहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.  


आयपीएलकडून राजस्थान रॉयल्स वरील या कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की,  राजस्थानच्या टीमकडून आयपीएल आचारसंहितेचा या सत्रात दुसऱ्यांदा उल्लंघन झालं आहे.  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.  


DC vs RR: संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीनंतरही राजस्थान पराभूत; दिल्ली कॅपिटल्स आता अव्वल स्थानी


संजूवर एका सामन्याच्या बंदीची शक्यता 
आयपीएल कमिटीकडून या सिझनसाठी स्लो ओव्हर रेटबाबत कडक नियम करण्यात आले आहेत. संजू सॅमसनला याआधीही यामुळं दंड आकारला होता. पहिल्या चुकीसाठी संजूला 12 लाखांचा दंड आकारला होता. जर आता तिसऱ्यांदा राजस्थानकडून ही चूक झाली तर संजूवर एका सामन्याची बंदी येऊ शकते.


दिल्ली 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी 


ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा या मोसमात 10 सामन्यांत आठवा विजय आहे. या विजयासह दिल्लीने 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.राजस्थानसाठी संजू सॅमसनने 53 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यांच्या व्यतिरिक्त फक्त महिपाल लोमरोर दुहेरी आकडा पार करू शकला. 155 धावा केल्यावर दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच राजस्थानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले आणि नियमित अंतराने विकेट घेतल्या.दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा खेळत 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सॅमसनच्या नाबाद 70 धावा असतानाही राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद 121 धावाच करू शकला. या मोसमातील 9 सामन्यांमध्ये राजस्थानचा हा पाचवा पराभव आहे. यासह तो गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे.