PBKS vs RCB, IPL 2021 Highlights:

  नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात पंजाबनं कर्णधार केएल राहुलच्या शानदार 91 धावा आणि हरप्रीतच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर विराट कोहलीच्या बंगळुरुवर 34 धावांनी विजय मिळवला. हरप्रीत आणि रवि बिश्नोई या फिरकीपटूंनी बंगळुरुच्या संघाला मैदानावर तग धरु दिली नाही. 


180 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर देवदत्त पडिक्कल केवळ सात धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली 35 धावा करून तंबूत परतला. हरप्रीत ब्रारनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला हरप्रीतनं शून्यावर त्रिफळाचीत केलं.


पुढच्या षटकात हरप्रीतनं  एबी डिव्हिलियर्सलाही बाद करत संघाचा विजय निश्चित केला. रजत पाटिदारने 31 धावांचे योगदान दिले तर शेवटी आलेल्या हर्षल पटेलने आक्रमक खेळी करत 13 चेंडूत 31 धावा केल्या. मात्र संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.  


त्याआधी पंजाबनं बंगळुरुसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबनं बंगळुरुसमोर केएल राहुलच्या 91 धावांच्या बळावर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबकडून सलामीला आलेला  प्रभसिमरन सिंग केवळ सात धावा करुन बाद झाला. त्यानंतर राहुल आणि ख्रिल गेलनं चांगली भागिदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल 46 धावा करुन बाद झाला. ख्रिस गेलनं कायल जेमिसनच्या एकाच ओव्हरमध्ये 5 चौकार ठोकले. गेलच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलचं दडपण आलेलं. मात्र गेल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेले शाहरुख खान आणि दीपक हुड्डा मैदानावर तग धरु शकले नाहीत. पूरन शून्यावर तर दीपक 5 धावांवर बाद झाला. तर शाहरुख खान देखील शून्यावर बाद झाला.  


एकीकडे फलंदाज बाद होत असताना कर्णधार केएल राहुलनं दुसरीकडे फटकेबाजी सुरु ठेवली होती. राहुलनं 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 57 चेंडूत 91 धावा केल्या. त्याला शेवटी हरप्रीत ब्रार याने राहुलला चांगली साथ दिली. हरप्रीतनं 17 चेंडूत 25 धावा केल्या. पंजाबने या हंगामात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरूने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे.