IPL 2021 आयपीएलचं यंदाचं पर्व बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आलं आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची विशेष चर्चा होताना दिसत आहे. सध्या बरंच बोललं जात आहे ते म्हणजे आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 16 व्या सामन्याविषयी. बंगळुरूच्या संघानं या सामन्यात राजस्थानच्या संघाला 10 विकेट्सनं मात दिली. यामध्ये अर्थातच खेळाडूंच्या खेळानं सर्वांची मनं जिंकली. पण, बंगळुरूच्या वेगवान गोलंदाजानं आवेगात केलेली एक कृती मात्र काहींना खटकली. 


भारतीय संघात असूनही पृथ्वी शॉला सतावत होती स्वत:च्याच खेळण्याच्या तंत्राची चिंता


वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यानं पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी केली. पण, एक क्षण असा आला, जेव्हा तो आवेगातच व्यक्त झाला. या सामन्यात रियान पराग हा राजस्थानचा खेळाडू 15 चेंडूंवर 25 धावा करत चांगल्या फॉर्ममध्ये होता. 14 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रियाननं फटकेबाजी सुरु केली. पण, तिसऱ्याच चेंडूवर एक जोराचा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. तेव्हाच बंगळुरूच्या या गोलंदाजानं त्याला रागातच एक विचित्र इशारा केला. 






हर्षल पटेलच्या या अशा वागण्यावर रियाननं कोणतीही प्रतिक्रिया न देता तो थेट पवेलियनच्या दिशेनं निघाला. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना हर्षलच्या या वागण्याचा अंदाजही लावणं कठीण होत आहे. पण, शेवटी क्रिकेटच्या या खेळात असे अनेक प्रसंग पाहायला मिळतातच, असं म्हणत या खेळाची वेगळी बाजूही अनेकांनीच समोर आणली.