महेंद्रसिंह धोनी (M S Dhoni) आपल्या मैदानातील वेगवेगळ्या डावपेचांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघ हरतोय असं वाटत असताना शेवटच्या क्षणी सामना फिरवण्याची किमया त्याने अनेकदा केली आहे. याची प्रचिती रविवार झालेल्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK vs MI) या सामन्यांमध्ये देखील आली. मुंबई इंडियन्स या सामन्यामधून जोरदार कमबॅक करत असताना, महेंद्रसिंह धोनीने ऐनवेळी असा डाव टाकला की सहज जिंकू अशा अविर्भावात असणाऱ्या मुंबई इंडियन्स ला पराभवाला सामोरे जावं लागलं.
ईशान किशन आणि सौरभ तिवारी मैदानावर असताना धोनीने मीडियम पेसर असलेल्या शार्दुल ठाकुर, ब्रावो आणि मोईन अली यांच्याकडे चेंडू सोपवला. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना मोठे शॉट्स लावणे अवघड होऊन बसले. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट व्हायच्या आधी शेवटच्या चेंडूवर कव्हर रीजनल एक फिल्डर होता. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नंतर धोनीने ईशान किशनला तंबूत धाडण्याचे पूर्ण नियोजन केले आणि ब्रावोकडे चेंडू सोपवला. स्लो असलेल्या पीचचा अंदाज घेऊन धोनीने सांगितल्याप्रमाणे ब्राव्होने स्लो बॉल टाकला. त्याआधी शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आणला होता. ब्राव्होच्या स्लो चेंडूवर ईशान किशन कितपत जोराचा टोला हाणू शकतो याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी सुरेश रैनाला उभं केलं होतं. आणि झालेही तसेच. ब्राव्होच्या चेंडूवर ईशान किशनने टोला लगावला तो थेट सुरेश रैनाच्या हातात गेला. हा सीन पाहिल्यानंतर धोनीला परफेक्ट स्ट्रॅटेजिस्ट आणि मिस्टर कूल का म्हणतात याचा अंदाज येतो.
एम एस धोनी (M S Dhoni) यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक यशाचे टप्पे गाठले. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने टी 20 आणि वन डे वर्ल्डकप जिंकले आहे. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.
चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत. या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.