IPL 2021, KKR vs PBKS : आयपीएल 2021 च्या स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब विरुद्ध कोलकाता भिडणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर या वर्षाच्या सुरुवातीला या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये दोन कसोटी आणि पाच टी-20 सामने खेळले गेले होते. त्यानंतर आज पहिलीच आयपीएल मॅच या मैदानावर रंगत आहे. आयपीएलचे पुढील सामने आता दिल्ली आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. आजच्या सामन्याच्या आधी पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने एक मजेशीर ट्वीट केलं आहे, जे खूप व्हायरल होत आहे.
जाफरने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील केएल राहुलच्या कामगिरीबद्दल एक मीम ट्विट केलं आहे. त्यानं हे शेअर करताना म्हटलं आहे की, राहुलआज पुन्हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत आहे. सोबतच्या मीममध्ये हेरा फेरी चित्रपटातील 'मुझे तो ऐसे धक-धक होरेला है' हा संवाद वापरण्यात आला आहे.
आज कोलकाता आणि पंजाब आमनेसामने असणार आहे. गुणतालिकेत पहिल्या 4 स्थानांबाहेर असणाऱ्या दोन संघांमध्ये मोदी स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. आयपीएल इतिहासात आतापर्यंत पंजाबपुढं कोलकात्याचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यात एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाताने 18 सामने जिंकले आहेत तर पंजाबने केवळ 9 सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्सने आपल्या गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सनी पराभव केला होता. तर कोलकाता नाइट रायडर्सचा आपल्या गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सहा विकेट्सनी परभाव केला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरतील.
कोलकाता नाईट रायडर्सची सर्वात मोठी चिंता ठरतेय ती म्हणजे, मिडल ऑर्डर. आतापर्यंतच्या सामन्यात कोलकाताची मिडल ऑर्डर फारशी चांगली खेळी करु शकली नाही. त्याचसोबत सलामीची जोडीही आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करुन देऊ न शकल्यामुळं संघासाठी अडचण निर्माण झाली आहे. कोलकाताचा कर्णधार इयोन मोर्गनही धावा करण्याच अयशस्वी ठरला. त्यानं पाच सामन्यांत आतापर्यंत केवळ 45 धावा केल्या आहेत.
पण पंजाबचा संघानं मुंबई इंडियन्सचा पराभव करत पुन्हा एकदा आपला विजयी चक्र सुरु केलं आहे. आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. दरम्यान, गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने तरुण लेग स्पिनर रवि बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं होतं. बिश्नोईनं चार ओव्हर्समध्ये केवळ 21 धावा देत दोन विकेट्स घेतले. दरम्यान, संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मयंक अग्रवाल आणि क्रिस गेल आपल्या फॉर्मात परतले आहेत. त्याचसोबत कर्णधार केएल राहुल या टुर्नामेंटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. तसं पाहायला गेलं तर, जरी फलंदाजीमध्ये पंजाबचं पारडं जड असलं तरी कोलकाताच्या गोलंदाजांसमोर निभाव लागण मात्र कठिण आहे.
पंजाबचा संभाव्य संघ : केएल राहुल (कर्णधाव आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मोइजेज हेनरिक्स, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.
कोलकाताचा संभाव्य संघ : शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, पेंट कमिंस, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा.