मुंबई : (IPL 2021) आयपीएलमधील (CSK) चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट संघात 'नेट बॉलर' म्हणून नेमतो सांगून हरियाणा येथील एका क्रिकेटवेड्या तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून या तरुणाकडून ५० हजार रुपये घेण्यात आले. मात्र नियुक्तीबाबत पुढे काहीच न झाल्याने या तरुणाने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


आयपीएलचा हंगाम शुक्रवारपासून सुरु झाला असून कोरोनाच्या सावटाखाली प्रेक्षकांअभावी सामने खेळविले जात आहेत. क्रिकेट शौकिनांबरोबर सर्वसामान्य जनतेमध्येही या स्पर्धेबाबत प्रचंड वेड आहे. क्रिकेट क्षेत्रात संधी आणि पदापर्णासाठी आयपीएल हे प्रवेशद्वार मानले जाते. हरियाणा येथील फरिदाबाद स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या आशिष पांडे याची इंस्टाग्रामवर राकेश गोस्वामी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. राकेश याने तो राजस्थानमधून स्थानिक क्रिकेट खेळतो असे सांगून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात नेट बॉलर म्हणून काम केल्याचे तो म्हणाला. यावर आशिष यानेही नेट बॉलर म्हणून काम करण्याची इच्छा त्याच्याकडे व्यक्त केली. 


IPL 2021 | कोळी गाण्यावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू ठेका धरतात तेव्हा...


राकेश याने चेन्नई सुपरकिंग्ज संघात नाईट बॉलर म्हणून नियुक्तीचे काम करून शकतो परंतु यासाठी ५० हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. क्रिक्रेट क्षेत्रात करियर करण्याची ही नामी संधी असल्याने आशिष याच्या कुटुंबीयांनी पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवली.


IPL 2021 | चेन्नई सुपरकिंग्ससाठी गेम चेंजर ठरु शकतो 'हा' खेळाडू


 राकेश याने आशिषला पैसे घेऊन मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले. विमानाने आशिष मुंबईत आल्यानंतर राकेश त्याला पंचतारांकित हॉटेलच्या दरवाज्यावर भेटला. दहा हजार रोख आणि इतर रक्कम राकेश याच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर केली. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे टी शर्ट आणि ओळखपत्र दोन तासांत मिळवून देतो असे सांगून राकेश गायब झाला तो पुन्हा परतलाच नाही. आशिषने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशिषने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्ररीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राकेश याचा शोध सुरु आहे. 


नेट बॉलर म्हणजे काय ?  


संघात निवड झालेल्या खेळाडूंना नेट सरावादरम्यान गोलंदाजी करण्यासाठी नवोदित खेळाडूंची निवड केली जाते. संघात समावेश असलेल्या गोलंदाजांवर ताण येऊ नये यासाठी संघात नसलेले हे नेट बॉलर नेटमध्ये गोलंदाजी करतात. गोलंदाजी चांगली वाटल्यास भविष्यात संघात सामावून घेण्यासाठी त्यांचा विचार केला जातो.