IPL 2021 | इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीझन 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्ज यावेळी कशी कामगिरी करणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. चेन्नईच्या संघात धोनी, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि इम्रान ताहिर सारख्या खेळाडूंचा समावेश आहे, पण या हंगामात संघात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश झाला आहे.


गेल्या हंगामात पॉवरप्लेमध्ये धावा करता न येणे आणि मिडल ऑर्डर फ्लॉप ठरणे संघाच्या निराशाजनक कामगिरीचं प्रमुख कारण होतं. गेल्या वर्षी रैना आयपीएलमध्ये खेळला नव्हता, परंतु या हंगामात त्याच्या पुनरागमनमुळे संघाची फलंदाजी मजबूत होईल. चेन्नईने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडून मोईन अलीला यावर्षी सात कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. याशिवाय चेन्नईकडे ऋतुराज गायकवाडसुद्धा आहे. इंग्लंडकडून मोईनने टी -20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर गेल्या मोसमात ऋतुराज गायकवाडने सलग अर्धशतक झळकावली होते आणि यावेळी तो चेन्नईचा सलामीवीर फलंदाज म्हणूनही उतरेल अशी अपेक्षा आहे.


फाफ डू प्लेसिसच्या रूपाने चेन्नईकडे आणखी एक जबरदस्त फलंदाज आहे. परंतु चेन्नईकडून सुरुवातीला दोघांपैकी कुणाला खेळण्याची संधी मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चेन्नई संघातील काही खेळाडू बऱ्याच कालावधीनंतर खेळत आहेत हे व्यवस्थापनासाठी एक आव्हान ठरू शकतं. रैना 2019 च्या आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर अलीकडेच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो खेळला. मात्र तिथेही त्यांने पाच सामन्यांत केवळ 102 धावा केल्या.


सॅम करन ठरु शकतो गेम चेंजर


गेल्यावर्षी आयपीएलनंतर धोनीही क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तर संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झाल्यापासून खेळला नाही. सॅम करन हा चेन्नई संघातील एकमेव  खेळाडू आहे जो यावर्षी सातत्याने क्रिकेट खेळत आहे.


चेन्नईचा संघ


महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, नारायण जगदीशन, ऋतूराज गायकवाड, केएम आसिफ, करण शर्मा, अंबाती रायुडू, दीपक चहर, फाफ डु प्लेसिस, शार्दुल ठाकुर, मिशेल सॅटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एंगेडी, सॅम करन, रवींद्र जाडेजा, इम्रान ताहिर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिशंकर रेड्डी, के. भगत वर्मा, सी. हरी निशांत आणि आर. साई किशोर