KKR vs DC, IPL 2021 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीसमोर 155 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान 16.3 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.
पृथ्वीने केलेल्या कारनाम्यामुळं पहिल्या षटकात दिल्लीने 25 धावा वसूल केल्या. पृथ्वीच्या सोबतीला शिखर धवननं देखील आपला फार्म कायम ठेवत चांगली खेळी केली. पृथ्वीनं शिवम मावीच्या पहिल्याच षटकात सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीने 41 चेंडूत तब्बल 22 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला.
शुभमन गिल आणि आंद्रे रसेलच्या स्फोटक फलंदाजीमुळे कोलकाताने 154 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताकडूनआंद्रे रसेलने 45 धावा आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या. कोलकाताकडून डावाची सुरुवात केलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात चांगली केली असं वाटत होतं. मात्र चौथ्या षटकात नितीश राणा 15 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने नितीश राणाला बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी कोलकाताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.
मात्र मार्कस स्टॉइनिसने 10 व्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद केले. राहुलने 17 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर कोलकाताला सलग दोन धक्के बसले. कर्णधार ईऑन मॉर्गन आणि सुनील नायारण शून्यावर बाद झाले. ललित यादवने दोघांना माघारी धाडलं. त्यानंतर चांगली खेळी करत असलेल्या शुभमन गिलही बाद झाला. शुभमनने 38 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि एक षटकार लगावला. कोलकाताची अवस्था 5 बाद 82 असताना आंद्रे रसेल मैदानात उतरला.
आंद्रे रसेलने तुफानी फटकेबाजी करत 27 चेंडूत 45 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. दिनेश कार्तिक 10 चेंडूत 14 धावा आणि पॅट कमिन्सने 11 धावा करत रसेलचा चांगली साथ दिली. अशारीतीने कोलकाताना 150 धावाचा टप्पा पार करत दिल्ली समोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. दिल्लीकडून अक्षर पटेल, ललित यादवने प्रत्येकी दोन तर आवेश खान आणि मार्क स्टॉयनिसने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.