IPL 2020: सिमरनजीत सिंग... परितोष पंत...डॉ. नायक... आयपीएलच्या मैदानातले हे कोणी खेळाडू नाहीत, तर ही नावं आहेत कोरोना योद्ध्यांची... आणि या कोरोना योद्ध्यांना सॅल्यूट ठोकलाय रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि युजवेंद्र चहल यांनी... कोरोनाच्या छायेखाली यंदा संयुक्त अरब अमिरातीत आयपीएल खेळवली जातेय. पण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. याच कोरोनाशी देशातले कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून लढतायत आणि त्यांच्याच कार्याचा गौरव करण्यासाठी बंगलोर संघानं 'माय कोव्हिड हिरोज' ही मोहिम सुरु केली आहे.


या मोहिमेचाच एक भाग म्हणून विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि युजवेंद्र चहल या बंगलोरच्या शिलेदारांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चक्क आपल्या जर्सीवर स्वत:च्या नावाऐवजी कोरोना योद्ध्यांची नावं ठेवलेली दिसली.


आता पाहूयात विराट आणि टीमच्या जर्सीवर नाव असलेले हे हीरो आहेत तरी कोण?


सिमरनजीत सिंग


सिमरनजीत सिंग ही व्यक्ती मूकबधीर आहे. पण त्यानं कोरोना काळात गरिबांसाठी मदत गोळा केली. त्यासाठी त्यांनी आपल्या अन्य मूकबधीर मित्रांची मदत घेतली. हे सर्वजण कोणत्याही संघटनेशी संबंधित नव्हते. पण त्यांनी निस्वार्थ भावानं लाखभर रुपयांची मदत गोळा केली. याच कार्यासाठी विराटनं आपल्या जर्सीवर सिमरनजीत हे नाव ठेवलं आहे.


परितोष पंत


परितोष पंतनं आपल्या मित्रांच्या साहाय्यानं लॉकडाऊनच्या काळात प्रोजेक्ट फीडींग फार ही मोहीम राबवली. या मोहिमेतून त्यांनी गरजूंना जेवण पुरवलं. म्हणूनच एबी डिव्हिलियर्सनं परितोषच्य़ा या कार्यासाठी त्याचं नाव आपल्या जर्सीवर ठेवलंय.


लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या जर्सीवरही कोरोना योद्धे डॉ. नायक यांचंही नाव दिसून आलं.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं याधीही आय़पीएलच्या मैदानात 'गो ग्रीन' उपक्रमाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला होता. यंदाही जर्सीवर कोरोना योद्ध्यांची नावं आणि माय कोव्हिड हीरोज मोहिमेद्वारे कोरोना योद्ध्यांप्रति आपला आदर व्यक्त केलाय. बंगलोरच्या ऑन फिल्ड कामगिरीप्रमाणेच ही कामगिरीदेखील कौतुकास्पद म्हणावी लागेल.


संबंधित बातम्या