IPL 2020, RCBvsDC: आयपीएलमधील यंदाच्या मोसमातील 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो संघ प्ले-ऑफमध्ये धडक मारेल आणि जो संघ पराभूत होईल तो त्या संघाचं आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल. आतापर्यंत दोन्ही संघांनी 13 सामने खेळले असून 7-7 सामने जिंकले आहेत. मात्र, नेट रन रेट चांगला असल्याने बंगलोरचा संघ दुसर्‍या स्थानावर आहे आणि दिल्ली तिसर्‍या स्थानावर आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सलग तीन सामन्यात पराभव


बंगलोरने यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर बंगळने फॉर्म गमावला. अखेरच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बंगलोरचा संघ केवळ 120 धावा करू शकला होता. या सामन्यात बंगलोरचा कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. तसेच गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक राहिली. बंगलोरला आजचा सामना जिंकायचा असेल तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल.


दिल्लीचाही सलग चार सामन्यात पराभव


आयपीएलचा अर्धा हंगाम संपेपर्यंत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी दिल्लीची अवस्था आता बिकट झाली आहे. गेल्या 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघातील फलंदाज त्यांच्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. विशेषत: मधल्या फळीची कामगिरी निराशाजनक आहे. अखेरच्या सामन्यात दिल्लीचा संघ मुंबई इंडियन्सविरूद्ध केवळ 110 धावा करू शकला होता. अशा परिस्थितीत दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संघाला प्ले ऑफमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.