IPL 2020  : मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. कालच्या दोन सामन्यानंतर प्वाईंट्स टेबलमध्ये काही महत्वाचे बदल झाले. विजयासह समान 10-10 गुण असताना देखील नेट रनरेटच्या आधारे मुंबई नंबर वन वर पोहोचली आहे. तर दिल्ली दुसऱ्या नंबरवर गेली आहे.  कोलकाता नाईट रायडर्स 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर विराट कोहलीचा बंगलोर रॉयल चॅलेजर्स तितक्याच गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आज कोलकाता आणि बंगलोर भिडणार आहेत. त्यामुळं तिसरं स्थानं पक्कं करण्याची संधी दोन्ही संघाकडे आहे.


पाचव्या स्थानी सहा गुणांसह हैदराबाद तर तितक्याच गुणांसह राजस्थान सहाव्या स्थानी आहे. चार गुणांसह चेन्नई सातव्या तर दोन गुणांसह पंजाब तळाला आहे.


कालच्या सामन्यात दिल्लीने मुंबईला 163 धावाचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 19.4 षटकात पूर्ण केलं. क्विंटन डिकॉक आणि सू्र्यकुमार यादवची खेळी निर्णायक ठरली. मात्र दिल्लीकडून शिखर धवनची नाबाद अर्थशतकी खेळी व्यर्थ गेली. पॉईंट टेबलमध्ये मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. दोन्ही संघांनी 7 सामन्यांपैकी 5-5 सामने जिंकले आहेत.


दिल्लीने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करत तंबूत परतला. त्यावेळी क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमारने डाव सावरला. डिकॉकने 36 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने 4 चौकर आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादवने 32 धावात 53 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर ईशान किशनने 28 धावा, कायरन पोलार्ड 11 धावा, कृणाल पांड्याने 12 धावांची खेळी केली. बर्थडे बॉय हार्दिक पांड्या मात्र आज शुन्यावर बाद झाला. दिल्लीकडून कागिसो रबाडाने 2, अक्षर पटेल, आर अश्विन, मार्क्स स्टॉयनिसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली,.


त्याआधी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 162 धावा केला. सध्या फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ 4 धावा करत स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या 15 धावांवर बाद झाला. शिखर धवनने एक बाजू लावून धरत 52 चेंडूत 69 धावाची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरनेही 42 धावा करत धवनला साथ दिली. स्टॉयनीसने 13 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.