शारजाह : आज आयपीएलमध्ये दुपारच्या सत्रात मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. धडाकेबाज फलंदाजांची फळी आणि अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणारा गोलंदाजीचा मारा ही वैशिष्ट्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे पारडे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात खेळू न शकल्यास हैदराबादच्या चिंतेत आणखी भर पडेल. भुवीला मागील सामन्यात दुखापत झाल्याने ओव्हरही पूर्ण करता आली नव्हती.


दुसरीकडे हैदराबादनं मागील दोन सामन्यात दिल्ली आणि चेन्नईसारख्या मजबूत संघांवर विजय मिळवला आहे. डेविड वार्नरची हैदराबाद  टीम विजयाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर मागील सामन्यात मुंबईने पंजाबला हरवलं होतं.

गुणतालिकेत मुंबई आणि हैदराबादला समान चार अंक आहेत. दोन्ही संघाने दोन विजय मिळवलेत तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज विजय मिळवून आपले दोन अंक वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहिल. शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर आज दुपारी साडेतीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

तळाच्या दोन संघांमध्ये दुसरी लढत


‘आयपीएल’च्या आज दुसऱ्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि के एल राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब पराभवाची कोंडी फोडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. चेन्नई गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी तीन पराभवाचा सामना केला आहे. चारपैकी तीन लढतीत पराभव पत्करावा लागल्याने या सामन्याद्वारे विजयीपथावर परतण्याचे दोन्ही संघांचे उद्दिष्ट असणार आहे. गेल्या सामन्यात अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांचे पुनरागमनही चेन्नईला तारू शकले नाही. सलामीवीर शेन वॉटसन आणि केदार जाधव यांचे अपयश चेन्नईला महागात पडत आहे.


चेन्नईकडून फलंदाजांचा फार्म ही चिंतेची बाब आहे. मुरली विजय, वॉटसन, केदार जाधवला साजेशी खेळी करता आलेली नाही. चेन्नईची आशा रायुडू, फाफ डू प्लेसीसकडून अधिक आहे. धोनीने देखील मागील सामन्यात एकाकी झुंज दिली होती.

पंजाबकडून भन्नाट फार्मात असलेला कर्णधार के एल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्याकडे लक्ष असेल. दोघांनी जबरदस्त खेळी करत संघाला तारले आहे. पण हे दोघे वगळता अन्य फलंदाजांना आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. तर गोलंदाजीची मजबूत फळी असून देखील मोठ्या धावसंख्या बनवूनही संघाला पराभव स्वीकारावे लागत आहेत.