न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत चांगली असल्याची माहिती आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, परत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये ते दाखल असलेल्या ग्रेट वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. काल त्यांनी कोरोना झाल्याचं सांगत क्वारंटाईन होत असल्याचं म्हटलं होतं.
एक व्हिडीओ ट्वीट करत ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'मी सर्वांचे आभार मानतो, मी वॉटर रीड हॉस्पिटलला चाललो आहे. मला वाटतं मी ठीक आहे मात्र सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात म्हणून मी दवाखान्यात दाखल होतोय. फर्स्ट लेडी देखील ठीक आहेत. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो, हे प्रेम कधीही विसरणार नाही.'
कोरोनाची बाधा झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.
मास्क घालायचं टाळायचे ट्रम्प
कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मास्कची मला गरज वाटत नाही. मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती.
अमेरिकेत स्थिती गंभीर
चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत.