IPL 2020 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या सुपर परफॉर्मन्सनं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. त्यामुळे आयपीएल प्ले ऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा सामना होणार आहे तो दुसऱ्या स्थानावरच्या दिल्ली कॅपिटल्सशी. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उद्या संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.


मुंबईची 'पलटन' सर्वांवर भारी


आयपीएलच्या तेराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवानं झाली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिल्याच सामन्यात मुंबई हरली. पण त्यानंतर रोहित शर्माच्या या फौजेनं प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत पुढच्या तेरा सामन्यांपैकी 9 सामने सहज जिंकले. मुंबई 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर राहिली. त्यामुळे क्वालिफायर वनमध्ये खेळण्याचा मान मुंबईला मिळाला.


चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सनं यंदाही लौकीकाला साजेशी कामगिरी बजावली. त्यात सलामीच्या क्विंटन डी कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांची फलंदाजीच्या आघाडीवरची भूमिका महत्वाची ठरली. डी कॉकनं यंदाच्या मोसमात मुंबईकडून आतापर्यंत सर्वाधिक 443 धावा फटकावल्या आहे. त्यापाठोपाठ ईशान किशननं 428 तर सूर्यकुमारच्या खात्यातही 410 धावा जमा आहेत. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या यांनीही अनेक सामन्यांमध्ये फलंदाजीत मोलाचं योगदान दिलंय.


मुंबईच्या गोलंदाजांचा तोफखानाही यंदा आग ओकतोय. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा, जेम्स पॅटिन्सन, कुल्टर नाईल यांच्या साथीला दीपक चहर आणि कृणाल पंड्याची फिरकीही प्रभावी ठरतेय. 'पर्पल कॅप'च्या शर्यतीतही बुमरा आणि बोल्ट आघाडीवर आहेत. त्यामुळे क्वालिफायर सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्वाची ठरणार आहे.



दिल्लीची मदार कुणावर?


दिल्ली सलामीवीर शिखर धवनही चांगल्याच फॉर्मात आहे. धवननं 14 सामन्यात 2 शतकं आणि तीन अर्धशतकांसह आतापर्यंत 525 धावा ठोकल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो लोकेश राहुल आणि डेव्हिड वॉर्नरनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरनंही 14 सामन्यात 414 धावा केल्या आहेत. बंगलोरविरुद्धच्या निर्णायक सामन्यात अजिंक्य रहाणेलाही सूर सापडला. पण पृथ्वी शॉचा फॉर्म हा दिल्लीच्या दृष्टीनं चिंतेचा विषय ठरावा. चेन्नईविरुद्धची 63 धावांची खेळी वगळता पृथ्वी शॉची कामगिरी जेमतेमच म्हणावी लागले.


कगिसो रबाडा आणि एनरिच नॉत्ये या वेगवान आफ्रिकन जोडगोळीमुळे दिल्लीच्या आक्रमणाला चांगलीच धार आली आहे. पण प्ले ऑफच्या निर्णायक सामन्यांमध्ये दिल्लीच्या इतर गोलंदाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहिल.


'मुंबई'कर दिल्लीला तारणार?


दिल्लीच्या या संघात मुंबईकर खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे हे मूळचे मुंबईचे खेळाडू दिल्लीच्या संघात आहेत. आणि या मोसमात त्यांनी दिल्लीच्या आतापर्यंतच्या यशात मोठा हातभार लावला आहे?


रोहित शर्मा फिट


मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून पूर्णपणे सावरलाय. तीन सामने विश्रांती घेतल्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत रोहित पुन्हा मैदानात उतरला. रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईची आघाडीची फळी आणखी मजबूत झाली आहे.


कुणाचं पारडं जड?


दिल्ली आणि मुंबई संघांमध्ये आजवर 26 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातल्या 14 सामन्यात मुंबईनं तर 12 सामन्यात दिल्लीनं विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात साखळीतल्या दोन लढतींमध्ये उभय संघांनी एकेक लढत जिंकली होती. त्यामुळे दुबईच्या मैदानात पहिल्या क्वालिफायरमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.


मुंबईनं याआधी पाच वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर दिल्लीला आजवर एकदाही अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलंय. त्यामुळे दुबईतली पहिली क्वालिफायर जिंकून दिल्ली पहिल्यांदाच फायनल गाठणार की मुंबई पाचव्या विजेतेपदाकडे कूच करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.