IPL 2020 : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला आहे. मुंबई कालच्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या सूर्यकुमार यादव आणि आरसीबीचा कप्तान विराट कोहलीमध्ये तसेच हार्दिक आणि सिराज यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. सामन्यादरम्यान हे खेळाडू एकमेकांशी बाचाबाची करताना दिसले.


मुंबईच्या 13 व्या षटकादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली  सूर्यकुमार यादव याच्या दिशेने आला. यावेळी दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. षटक संपल्यानंतर विराट चेंडू घेऊन सूर्यकुमारकडे गेला. मात्र सूर्यकुमारनं शांत राहणं पसंत केलं. त्यानं मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिला. तर याच सामन्यात हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांच्यात देखील  बाचाबाची पाहायला मिळाली.


जेवलीस का? मॅचदरम्यान विराटचा अनुष्काला प्रश्न, व्हिडीओ व्हायरल


मुंबईकडून बंगलोरचा 5 विकेट्सने पराभव
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला. मुंबई विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली. बंगलोरने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक 18 धावांवर बाद झाला. ईशान किशनला डावाची सुरुवात चांगली केली पण मोठा फटका खेळताना तो 25 धावांवर बाद झाला. सौरभ तिवारी आणि कृणाला पांड्याही स्वस्तात माघारी गेले. सौरव तिवारीने 5 तर कृणाल पांड्याने 10 धावा केल्या. एकीकडे एक एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 17 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. बंगलोरकडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहलने प्रत्येक दोन तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.


त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात दमदार झाली. जोश फिलिप आणि देवदत्त पड्डिकल यांनी पहिल्या विकेटसाठी 7.5 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. फिलिप 24 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 14 चेंडूत केवळ 9 धावा करून बाद झाला. बुमराहने त्याला माघारी धाडलं. कोहलीनंतर एबी डिव्हिलियर्ससुद्धा 15 धावांवर बाद झाला.


डिव्हिलियर्सनंतर देवदत्त पड्डिकलही 74 धावांवर बाद झाला. पड्डिकलने यंदाच्या सीजनमधलं चौथं अर्धशतक झळकावलं. पड्डिकलनंतर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात माघारी परतलं. डावाच्या शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 6 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या आणि गुरकीरतसिंग मानने 11 चेंडूंत नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने उत्तम गोलंदाजी करत चार षटकांत 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.