IPL 2020 DCvKXIP : आयपीएलच्या मैदानात आज श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल आणि लोकेश राहुलच्या किंग्स इलेव्हनमध्ये सामना रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. दिल्लीच्या संघात मुंबईकर खेळाडूंचा भरणा जास्त आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या तिघा मुंबईकर खेळाडूंवर दिल्लीची भिस्त राहिल. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या संघानं यंदा कसून सराव केला आहे.


रहाणेचा नंबर कोणता?


गेले काही मोसम राजस्थानकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला यंदाच्या मोसमासाठी दिल्लीनं करारबद्ध केलं आहे. पण दिल्लीची फलंदाजांची खोली पाहता आता रहाणेला कोणत्या क्रमांकावर खेळवणार हा संघव्यवस्थापनासमोरचा मोठा प्रश्न आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, त्यानंतर रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर अशी भक्कम फळी दिल्लीकडे आहे. यात अजिंक्य रहाणेला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला धाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


लोकेश राहुलच्या नेतृत्वात पंजाब सज्ज


लोकेश राहुलच्या रुपात यंदा किंग्स इलेव्हन पंजाबला नवं नेतृत्व मिळालं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षकपदाची धुरा भारताचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळेकडे सोपवण्यात आली आहे. पंजाबला आयपीएलच्या इतिहासात आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. कुंबळेच्या साथीनं लोकेश राहुलची फौज किंग्स इलेव्हन फ्रँचायझीचं विजेतेपदाचं स्वप्न साकार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


आकडेवारी काय सांगते?


आयपीएलच्या मैदानात दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ आजवर 24 वेळा आमनेसामने आले आहेत त्यात 14 वेळा पंजाबनं तर 10 वेळा दिल्लीनं बाजी मारली आहे.