IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीजन संपुष्टात आला आहे. आता आयपीएल 2020 मधील कामगिरीच्या जोरावर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ त्यांचा सर्वोत्कृष्ट संघ निवडत आहेत. दरम्यान, माजी भारतीय स्टार गोलंदाज अजित आगरकरने 'स्टार स्पोर्ट्स' वर बेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे, ज्यात त्याने 'ऑरेंज कॅप' विजेता केएल राहुलसह अनेक बड्या भारतीय खेळाडुंना स्थान दिलं नाही.


आगरकरच्या संघात राहुल, रोहित आणि कोहलीला स्थान नाही


यावर्षीच्या आयपीएल 2020 च्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये अजित आगरकरने केएल राहुल, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माचा समावेश केलेला नाही. याशिवाय त्याने आंद्रे रसेलचा देखील आपल्या संघात स्थान दिलेलं नाही. आगरकरने त्याच्या संघात पाच फलंदाज, दोन अष्टपैलू, दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने फिरकी गोलंदाजीत स्पर्धेत सर्वात किफायतशीर असलेल्या राशिद खानचीही निवड केलेली नाही.


आगरकरने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सलामीवीर म्हणून निवडले आहे. याशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स यांनाही त्यांच्या संघात स्थान दिलं आहे. त्याचबरोबर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचीही आपल्या संघात निवड केली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. रबाडाने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्ससह पर्पल कॅप मिळवली होती. बुमराह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता.


अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन


डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.