IPL 2020, CSKvsKXIP | आयपीएल 2020 च्या 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. या मोसमातील चेन्नईचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी चेन्नईला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात प्रथम खेळत पंजाबने 20 षटकांत चार गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने कोणताही गडी न गमावता 17.4 षटकांत लक्ष्य गाठलं आहे.


पंजाबच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनने तुफान फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. वॉटसनने 53 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. तर प्लेसिसने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 87 धावा फटकावल्या. या मोसमातील वॉटसनचे हे पहिले अर्धशतक आहे.


IPL 2020 | महेंद्रसिंह धोनीच्या नावे आणखी एक विक्रम


तत्पूर्वी, चेन्नईविरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने 20 षटकात 178 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 8.1 षटकांत 61 धावांची भागीदारी केली. मात्र, मयंक अग्रवाल 26 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंग देखील 27 धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब 200 पार पोहोचणार असं वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात परत आणलं. के एल राहुलने 52 चेंडूत 63 तर निकोलस पुरन याने 17 चेंडूत 3 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 33 धावा धावसंख्येत जोडली.


ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही. मॅक्सवेलच्या नाबाद 11 आणि सर्फराजच्या नाबाद 14 धावांच्या जोरावर पंजाबला 178 धावांपर्यंतच मजला मारता आली. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर रवींद्र जडेजा आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.