बीड : पीएफचे पैसे मिळावे यासाठी मुलांनी जन्मदात्या आईवरच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली कानडी माळी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.


चिंचोली कानडी माळी येथील इंदुबाई कुचेकर यांचे पती लालासाहेब कुचेकर हे पोलीस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले आणि त्यामुळे त्यांना मयत घोषित करण्यात आले होते. लालासाहेब कुचेकर यांच्या पश्चात वारस म्हणून त्यांची पत्नी इंदुबाई कुचेकर यांच्या नावे पीएफमध्ये एकूण 13 लाख रुपये होते.


या रकमेतून दोन्ही मुलांना त्यांनी 9 लाख 84 हजार रुपये दिले होते. त्यानंतरही उर्वरित पैशासाठी मुलं सारखा तगादा लावत होते. त्यातून दोन्ही मुले संतोष आणि सचिन संगणमत करून आपल्या आईशी सतत भांडण करत असत. संतोष कुचेकर व सचिन कुचेकर या दोघांनी आपली जन्मदाती आई इंदुबाई कुचेकर यांच्यासोबत आम्हाला तुझ्या नावावर असलेले पीएफमधील पैसे का देत नाहीस म्हणून पुन्हा भांडण केले.


पैशांना नकार देताच नितीन याने संतोषला त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल इंदुबाई यांच्या अंगावर टाक, आजच हिला जीवे मारु असं म्हटलं. हे ऐकताच इंदुबाई यांनी तेथून पळ काढला. मात्र त्या दोघांनी पाठलाग करत गावातील एका दुकानासमोर त्यांना गाठले. संतोष याने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले, तर दुसरा मुलगा नितीन याने जीवे मारण्याच्या उद्देशाने काडीपेटीतील काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकणार तोच गावातील सरपंच अमर राऊत यांनी त्याच्या हातावर मारून काडी विझवली. राऊत यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.


इंदुबाई कुचेकर यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला संतोष कुचेकर आणि सचिन कुचेकर या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जन्मदात्या आईवरच केवळ पैशासाठी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.


TOP 50 | दिवसभरातील 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 4 ऑक्टोबर 2020