मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेली आग 35 तास उलटून गेल्यानंतरही अजून धुमसत आहे. सध्या या ठिकाणी 14 पाईपलाईनच्या मदतीने आणि दोन मोठ्या शिडीच्या सहाय्याने मॉलच्या बाहेरुन अविरत पाण्याचा मारा सुरु आहे. मात्र मॉलमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि दुकानातील लाकडी फर्निचर यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. या मॉलचे दोन मजले जळून पूर्णपणे खाक झाले.


दरम्यान राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) रात्री घटनास्थळाची पाहणी केली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या आगीवर त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता आधी अग्निशमन दलाला काम करु द्या, असं त्यांनी सांगितलं.


"सिटी सेंटर मॉलची पाहणी केली. मी आगीबाबत सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसंच कोणीही जखमी झालेलं नाही. आपले अग्निशमन दलाचे शूर जवान फायर डाऊसिंग रोबोचा वापर करुन काम करत आहेत," असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.





 मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सिटी सेंटर मॉलला गुरुवारी (22 ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास 200 हून अधिक दुकानं आहे. या सर्व दुकानांमध्ये मोबाईल अॅक्सेसरीजची दुकानं जास्त आहेत. त्यामुळे या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.


ब्रिगेड कॉल म्हणजेच, लेव्हल 4 च्याही पुढचा कॉल. याचाच अर्थ असा होतो की, मुंबईतील अग्निशमन दलाची सर्व केंद्र आहेत, तिथून मदतीचं आवाहन करण्यात येतं. आग विझवण्यासाठी तिथून यंत्रणा मागवण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलासोबतच काही खासगी यंत्रणांचीही मदत ही आग विझवण्यासाठी घेण्यात येत आहे.