मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावे पाच हजार 110 (5110) धावा जमा आहेत.

बंगळुरुत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान आतापर्यंत सुरेश रैनाच्या नावे होता. रैनाने आयपीएलमध्ये पाच हजार 86 (5086) धावा केल्या आहेत.

कोहलीने कालच्या सामन्यात 49 चेंडूंमध्ये 84 धावा केल्या. या मोसमातील कोहलीचं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. 31 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतकापर्यंत मजल मारली होती. आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात हे कोहलीचं 35 वं अर्धशतक आहे.

कोहलीची झुंजार खेळी त्याला वैयक्तिक विक्रमासाठी फायदेशीर ठरली, तरी बंगळुरु संघाला हा सामना जिंकता आला नाही. बंगळुरुने दिलेले 206 धावांचे आव्हान कोलकाता नाईट राईडर्सने सहज पार करत तिसरा विजय साजरा केला. तर बंगळुरुची पराभवाची मालिका कायम राहिली.

दरम्यान, कोहली हा टी20 फॉर्मेटमध्ये आठ हजार धावा करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी केवळ सुरेश रैनाच्या नावे हा विक्रम होता. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा ट्वेण्टी ट्वेण्टीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 374 सामन्यात त्याने बारा हजार 374 धावा ठोकल्या आहेत. ब्रँडन मॅक्युलम हा यादीत 9 हजार 922 धावांसह दुसरा आहे.