मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध 'लागिरं झालं जी' या मालिकेतील कलाकारांना नोकरीच्या आमिषाने 16 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालिकेत फास्टर राहुल्या आणि स्लोअर राहुल्या या भूमिका करणाऱ्या दोघा कलाकारांची फसवणूक झाल्याचं तीन वर्षांनी उघडकीस आलं आहे.


'लागिरं झालं जी' मालिकेत फास्टर राहुल्याची भूमिका करणारा केशव उर्फ राहुल उत्तम जगताप आणि स्लोअर राहुल्याची भूमिका साकारणारा राहुल संभाजी मगदूम यांची फसवणूक झाली.

अमरावतीत राहणारे संतोष साहेबराव जामनिक उर्फ अक्षय मिश्रा आणि विलास गोवर्धन जाधव अशी संशयितांची नावं आहेत. फसवणूक प्रकरणी अमरावती जिल्ह्यात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी राहुल जगताप आणि  राहुल मगदूम कोल्हापूरला सैन्य भरतीसाठी गेले होते. त्यावेळी भोसेमधील कृष्णदेव पाटीलशी त्यांची ओळख झाली. नोकरीबाबत तिघांची चर्चा झाली होती. 'अमरावतीतील दोघे जण माझ्या माहितीत असून त्यांच्या ओळखीने तुम्हाला नोकरी मिळू शकते' असा दावा कृष्णदेवने केला.

EXCLUSIVE : मामी आणि जयडी यांनी 'लागिरं झालं जी' मालिका का सोडली?



सरकारी बँकेत नोकरी देण्याच्या मोबदल्यात दोघांनी प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं ठरवलं. राहुल मगदूमने एक लाख रुपये रोख दिले, तर राहुल जगतापने धनादेश दिला. त्यानंतर दोघं जण तीन वर्षांपासून संशयित आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर रक्‍कम पाठवत होते.

दोघांनी प्रत्येकी आठ लाख, असे 16 लाख रुपये संशयितांच्या खात्यावर जमा केले. काही दिवसांनी जगताप व मगदूम यांनी नोकरीसंदर्भात विचारणा सुरु केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळू लागली. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर राहुल जगताप यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.