IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2019 11:59 PM (IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता कोलकात्याचा मुंबईविरोधात पराभव झाल्यासच हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळणार आहे.
बंगळुरु : हेटमायर आणि गुरकीरत मान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता कोलकात्याचा मुंबईविरोधात पराभव झाल्यासच हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळणार आहे. आजच्या सामन्यात 176 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर पार्थिव पटेल शून्यावर तर एबी डिव्हिलियर्स अवघी एक धाव काढून बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने 16 धावा काढल्या. झटपट तीन विकेट्स गेल्याने अडचणीत आलेल्या बंगलोरच्या संघाला हेटमायर आणि गुरकीरत मान यांनी मोठी भागीदारी करत विजयाच्या समीप आणले. अंतिम षटकांमध्ये हेटमायर 75 तर गुरकीरत मान 65 धावा काढून बाद झाले. हेटमायरने 47 चेंडूत सहा षटकार आणि चार चौकारांसह 75 तर मानने 48 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. अंतिम षटकात सहा धावांची गरज असताना उमेश यादवने सलग २ चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, कर्णधार केन विल्यम्सनच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. उभय संघांतला अखेरचा साखळी सामना सध्या बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. हैदराबादच्या केन विल्यम्सननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना नाबाद 70 धावा फटकावल्या. त्यानं उमेश यादवच्या अखेरच्या षटकात दोन षटकार आणि तीन चौकारांसह 28 धावा वसूल केल्या. याशिवाय मार्टिन गप्टिलनं 30 तर विजय शंकरनं 27 धावांचं योगदान दिलं. बंगलोरकडून वॉशिंग्टन सुंदरनं तीन तर नवदीप सैनीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. बंगलोरकडून वॉशिंग्टन सुंदरने 3, नवदीप सैनीने 2 तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या.