अरविंद केजरीवालांना कानाखाली लगावल्यानंतर आप कार्यकर्त्यांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली. या युवकाला दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
या घटनेनंतर आपचे नेते संजय सिंह यांनी दिल्ली पोलीस आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय सिंह यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा मोदी सरकारच्या अधीन आहे. अरविंद केजरीवाल यांचे जीवन सर्वात असुरक्षित आहे. त्यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. हिम्मत असेल तर समोर येऊन वार करा, दुसऱ्यांना पुढे करून असे हल्ले का करता? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, केजरीवाल यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. मोदी सरकार अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठ्या हल्ल्याची वाट बघतंय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. मोदी आणि अमित शाह हे केजरीवाल यांची हत्या करवू पाहताहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. 5 वर्ष सगळी ताकत लावून त्यांचे मनोबल तोडू शकले नाहीत, निवडणुकांमध्ये हरवू शकले नाहीत. त्यांना अशा पद्धतीने हटवू पाहत आहात काय? असे म्हणत केजरीवाल तुमचा काळ आहे, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.
माहितीनुसार सदर मारहाण करणारा युवक या परिसरातील राहणारा नाही. तो बाहेरून आला आहे. केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांना एका रिक्षा चालकाने कानाखाली मारली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केजरीवाल यांच्यावर अज्ञात व्यक्तीने मिरची पावडर फेकली होती.