राज ठाकरेंचे व्हिडीओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषण बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ किती खरे किती खोटे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी बारामतीचा विकास केला. मात्र बारामतीसारखा विकास त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा करायला हवा होता. राष्ट्रवादीत एकमेव व्हिजनरी माणूस म्हणजे शरद पवार हे आहेत. मात्र त्यांनी महाराष्ट्राचा विकास का केला नाही? असा सवाल देखील गोखले यांनी केला. त्यांचे ईव्हीएमबद्दलचे विधान चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचं सांगितलं आहे. ही नोटाबंदी नंतरही करता आली असती. नोटाबंदीमुळे काळा पैसा कुठेही थांबणार नाही. नोटाबंदीने काहीच साध्य झालं नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
बुलेट ट्रेन ही प्राथमिकता नाही. या देशातला सामान्य माणूस पाणी, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सोयींसाठी झगडत आहे, त्यावेळी अशा गोष्टींची गरज नाही, असेही गोखले यावेळी म्हणाले.
कुठेही हत्या होणे हे वाईटच आहे. मात्र अशा हत्या आधी कधीच झाल्या नाहीत का? विचारवंतांना कधीच अटक झाली नाही का? याचा अर्थ असा नाही की आता होतंय ते बरोबर होतं आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले.
नयनतारा सहगल यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हवं होतं. त्यांना त्यांची भावना मांडू न देणे ही सरकारची चूकच आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.