बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं किंग्स इलेव्हन पंजाबचा 17 धावांनी धुव्वा उडवून, आयपीएलमधल्या आपल्या आव्हानात धुगधुगी कायम राखली. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या विजयासह बंगलोरचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर दाखल झाला आहे.
बंगलोरच्या पंजाबवरच्या विजयाचा एबी डिव्हिलियर्स हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 44 चेंडूंत नाबाद 82 धावांची खेळी उभारली. त्याच्या याच खेळीनं बंगलोरला 20 षटकांत चार बाद 202 धावांची मजल मारून दिली. पार्थिव पटेलनं 43 आणि मार्कस स्टॉईनिसनं नाबाद 46 धावांची खेळी रचून बंगलोरच्या डावाला मजबुती दिली. त्यानंतर बंगलोरच्या गोलंदाजांनी पंजाबला 20 षटकांत सात बाद 185 धावांत रोखलं.
बंगलोरच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबकडून निकोलस पुरनने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली, तर केएल राहुलनं 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. क्रिस गेलने केवळ 10 चेंडूत 23 धावा, मयंक अगरवालने 21 चेंडूत 35 धावा, तर डेविड मिलरने 24 धावा केल्या.
पंजाबनं अवघ्या 9 व्या षटकात 100 धावांचा टप्पा पार केला होता. मात्र बंगलोरच्या गोलंदाजांनी सामन्यात विजय खेचून आणला. बंगलोरकडून उमेश यादवने 3, नवदीप सैनीने 2, स्टॉयनिस आणि मोईन अलीने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.