IPL 2019, RCB vs CSK : थरारक सामन्यात बंगलोरची चेन्नईवर मात, धोनीची एकाकी झुंज अपयशी
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2019 08:32 AM (IST)
2018 नंतर चेन्नईला पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मोसमात दहा सामन्यांमधील चेन्नईचा हा तिसरा पराभव आहे. तरीही चेन्नई 14 अंकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
बंगलोर : महेंद्रसिंह धोनीने प्रयत्नांची शर्थ करुनही चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल सामन्यात बंगलोरकडून अवघ्या एका धावेने सनसनाटी पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना शार्दूल ठाकूर धावचीत झाला आणि धोनीची एकाकी झुंज अयशस्वी ठरली. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पार्थिव पटेलच्या आक्रमक अर्धशतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्ससमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बंगलोरचा सलामीवीर पार्थिव पटेलने 37 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह 53 धावा फटकावल्या. याशिवाय एबी डिव्हिलियर्सने 25 तर मोईन अलीने अखेरच्या हाणामारीच्या षटकांत 26 धावा कुटल्या. त्यामुळे बंगलोरला 20 षटकांत सात बाद 161 धावांची मजल मारता आली. चेन्नईकडून दीपक चहर, रविंद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नंतर चेन्नईचा कर्णधार धोनीने स्फोटक खेळी करुन ते आव्हान सहा चेंडूत 26 धावा अशा समीकरणावर आणलं. अखेरच्या षटकात तर धोनीने उमेश यादववर हल्ला चढवून तीन षटकार आणि एका चौकारासह पाच चेंडूत 24 धावा वसूल केल्या. उमेशचा अखेरचा चेंडू मात्र धोनीच्या बॅटच्या पट्ट्यातून हुकला आणि यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे गेला. त्यावर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दूल ठाकूर धावचीत झाला. त्यामुळे चेन्नईने हा सामना अवघ्या एका धावेने गमावला. धोनीने 84 धावांची तुफानी खेळी रचली. 2018 नंतर चेन्नईला पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मोसमात दहा सामन्यांमधील चेन्नईचा हा तिसरा पराभव आहे. तरीही चेन्नई 14 अंकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. तर बंगलोरचा दहा सामन्यांमधील हा तिसरा विजय असून सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहे.