कोलंबो : श्रीलंकेतील बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री राधिका शरतकुमार या थोडक्यात बचावल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. मात्र बॉम्बस्फोट होण्यापूर्वी त्या हॉटेलमधून बाहेर पडल्या होत्या.


राधिका यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. राधिका सिनामोन ग्रँड हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हे हॉटेल श्रीलंकेचे पंतप्रधान यांच्या निवासस्थापासून काही अंतरावर आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, "अरे देवा, श्रीलंकेत बॉम्बस्फोट.. देवा सर्वांसोबत राहा. मी बॉम्बस्फोट होण्याच्या काही वेळ आधी सिनामोन ग्रँडमधून बाहेर पडली. माझा यावर विश्वास नाही. आश्चर्यकारक!"






राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरला. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अँटनी चर्च, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये , तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.


या बॉम्बस्फोटात दुर्दैवाने 215 जणांना मृत्यू झाला आहे. तर 500 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.


बॉम्बस्फोटांमुळे कोलंबोतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आपत्तीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत.


संबंधित बातम्या


श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती


श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार


श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी