जयपूर : आयपीएलमध्ये आज झालेल्या सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या जबाबदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच विकेट्सनी दणदणीत मात केली आहे. राजस्थानचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात मुंबईने राजस्थानसमोर 162 धावांचे आव्हान उभे केले होते. राजस्थानने हे आव्हान पाच विकेट्स आणि पाच चेंडू राखून यशस्वीरित्या पार केले. पहिल्यांदाच कर्णधारपदाची सूत्र स्वीकारलेल्या स्मिथने शेवटपर्यंत किल्ला लढवत राजस्थानला विजय मिळवून दिला.


स्मिथने  48 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. तर 17 वर्षांच्या रियान परागने 29 चेंडूत 43 धावांची खेळी करुन त्याला सुरेख साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. ही भागिदारी राजस्थानच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. मुंबईकडून राहुल चहरने 4 षटकात 29 धावा देत राजस्थानचे 3 गडी बाद केले

तत्पूर्वी आजच्या सामन्यात मुंबईची सुरुवात वाईट झाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (5 धावा) स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ केला. या दोघांच्या 97 धावांच्या भागिदारीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्ससमोर 5 गड्यांच्या बदल्यात 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. डी कॉकने 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांच्या सहाय्याने 65 धावा केल्या. यादवने 34 तर हार्दिक पंड्याने 23 धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपालने 4 षटकात 21 धावा देत मुंबईचे 2 गडी बाद केले.