मुंबई : 'दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही', अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना 'भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला', असे वक्तव्य केले होते. त्या विधानावर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली आहे.


"मिस्टर क्लीन प्रतिमा बनलेल्या नेत्याचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रूपात झाला", अशी टीका मोदींनी केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत असताना राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची" असं देखील राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे. तसेच "स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही", असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मोदींच्या त्या वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे. माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकणार नाही", असं ट्वीट राहुल गांधींनी केले आहे.


तसेच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल आणखी एका स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्म्याचा अपमान केला आहे. राजीव गांधींनी ज्यांच्यासाठी बलिदान दिले ती जनताच तुम्हाला उत्तर देईल. हा देश फसवणुकीला कधीच माफ करत नाही', असं ट्वीट प्रियंका गांधींनी केले आहे.


व्हिडीओ :