मोहाली : इंडियन प्रिमियर लीगच्या 12 व्या हंगामातील 9 वा सामना आज मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा धुव्वा उडवला आहे. मुंबईने दिलेले 177 धावांचे आव्हान पंजाबने 8 गडी आणि 8 चेंडू राखून पूर्ण केले. पंजाबचा लोकेश राहुल या सामन्याचा शिल्पकार ठरला.


पंजाबच्या लोकेश राहुलने सर्वाधिक 57 चेंडूत 71 धावा करत मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. त्याला ख्रिस गेल (24 चेंडूत 40 धावा)आणि मयांक अग्रवालने (21 चेंडूत 43 धावा) चांगली साथ दिली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबने मुंबईला धूळ चारली.

मुंबईचे गोलंदाज आजच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या सर्व गोलंदांजांची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. कृणाल पंड्याने पंजाबचे दोन गडी बाद केले खरे, परंतु त्याच्या 4 षटकात पंजाबने तब्बल 43 धावा कुटल्या. पंड्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही गोलंजाला एकही गडी बाद करता आला नाही.

तत्पूर्वी मुंबईच्या संघानेदेखील चांगली फलंदाजी करत 176 धावा केल्या होत्या. मुंबईकडून क्वींटन डिकॉक याने 39 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूत 32 धावा करत चांगली साध दिली. परंतु दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यावर हार्दिक पंड्यावगळता कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंड्यांने शेवटच्या षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करत 19 चेंडूत 31 धावा केल्या. रोहित, डिकॉक आणि पंड्या या तिघांच्या जोरावर मुंबईने 176 धावांपर्यंत मजल मारली होती.