IPL 2019 : सॅम करनची हॅट्ट्रिक, पंजाबचा तिसरा विजय
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2019 12:14 AM (IST)
आयपीएलमध्ये आज मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात यजमान दिल्लीच्या संघाला पंजाबने दिलेल्या 167 धावांचे आव्हान पार करता आले नाही.
मोहाली : सॅम करनच्या हॅटट्रिकच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. पंजाबचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात पंजाबनं दिल्लीसमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पंजाबच्या प्रभावी माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला. पंजाबकडून सॅम करनन अवघ्या 11 धावा देत हॅटट्रिकसह चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी डेव्हिड मिलर आणि सर्फराज खानच्या जबाबदार खेळीमुळे पंजाबनं 20 षटकांत 9 बाद 166 धावांची मजल मारली होती. पंजाबचे 167 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठेवली होती. दिल्लीचा संघ एकवेळ 3 बाद 144 अश मजबूत स्थितीत होता. परंतु अंतिम क्षणी पंजाबच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. दिल्लीकडून ऋषभ पंत (39 )आणि कॉलिन इन्ग्रामने (38) सामना चांगली फलंदाजी केली. तर पंजाकडून सॅम करनने 11 धावात 4 बळी टिपले, त्याला कर्णधार अश्विन (31 धावांत 2 बळी)आणि मोहम्मद शमीने (27 धावांत 2 बळी )चांगली साथ दिली. सॅम करनची हॅट्ट्रिक पंजाबच्या सॅम करननं यंदाच्या मोसमातल्या पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. आयपीएलच्या इतिहासातली ही अठरावी हॅटट्रिक ठरली. करननं अठराव्या षटकातल्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलला माघारी धाडलं. त्यानंतर विसाव्या षटकात पहिल्या चेंडूवर कगिसो रबाडा आणि दुसऱ्या चेंडूवर संदीप लमिछानेचा त्रिफळा उडवत करननं शानदार हॅटट्रिक साजरी केली. त्यानं या सामन्यात 2.2 षटकांत अवघ्या अकरा धावा देत चार फलंदाजांना माघारी धाडलं.