एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सीमेजवळ भारतीय रडारनं चार पाकिस्तानी एफ-16 विमानं आणि एक मोठ्या आकाराचा यूएव्ही पाहिला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतले. भारतीय लढाऊ विमाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं माघारी फिरली.
पाकिस्तानमध्ये वास्तव्य असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर 13 दिवसांनी 27 फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदजे अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्यात 250 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासून पाकिस्तानी सैन्य आणि हवाई दल सैरभैर झाले आहे.
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे एक एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. परंतु भारतीय वायुसेनेचे विंग कंमांडर अभिनंदन वर्थमन यांनी मिग-21 विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानच्या विमानावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे एफ-16 विमान कोसळले. अभिनंदन वर्थमन यांचे विमानही या धुमश्चक्रीत क्रॅश झाले आणि अभिनंदन पाकिस्तानी हद्दीत कोसळले. अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते. परंतु भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला अभिनंदन यांची मायदेशी रवानगी करावी लागली.