शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सामना संपायला दोन चेंडू असताना वॉटसन धावचीत झाला आणि सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर केवळ दोन धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाने त्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून, मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादमधल्या या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रोहित शर्माने मुंबईला पाच षटकांत 45 धावांची सलामी दिली होती. शार्दूल ठाकूरने डी कॉकला माघारी धाडून ही जोडी फोडली आणि मुंबईच्या डावाला घरघर सुरु झाली. मुंबईची एक बाद ४५ धावांवरून १५ षटकांत पाच बाद 102 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत कायरन पोलार्डने 25 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला आकार दिला.