हैदराबाद : चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पाठदुखी भलतीच महागात पडली. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या सामन्यात चेन्नईचा 19 चेंडू राखत सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. हैदराबादचा आठ सामन्यांमधला हा चौथा विजय, तर चेन्नईचा नऊ सामन्यांमधला दुसरा पराभव ठरला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईला वीस षटकांत अवघ्या पाच बाद 132 धावांत रोखलं होतं. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या 66 धावांची सलामी देऊन हैदराबादचा लक्ष्याचा पाठलाग आणखी सोपा बनवला. वॉर्नरने 50 धावांची, तर बेअरस्टोने नाबाद 61 धावांची खेळी उभारली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पाठदुखीच्या कारणास्तव या सामन्यातून विश्रांती घेतली. धोनीच्या अनुपस्थितीत या सामन्यात सुरेश रैनाने चेन्नईचं नेतृत्त्व केलं. आयपीएल सामन्यात चेन्नईचं नेतृत्त्व न करण्याची धोनीची ही 2010 सालानंतर पहिलीच वेळ होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीची पाठ दुखावली होती. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली. धोनीला विश्रांती हवी होती, पण पुढच्या सामन्यात तो नक्की खेळेल, अशी माहिती रैनाने नाणेफेकीनंतर दिली. आयपीएलच्या रणांगणात सामन्यागणिक चुरस वाढू लागली आहे. स्पर्धेतल्या आठही संघांमध्ये टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. 9 पैकी 7 सामन्यांमधील विजयामुळे 14 गुणांसह चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल दुसऱ्या, मुंबई इंडियन्स तिसऱ्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब चौथ्या स्थानावर आहे.