सातारा : राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरील टीकेचा धडाका सुरुच आहे. मुंबई, नांदेड, इंचलकरंजी, सोलापूर नंतर राज ठाकरेंनी आज साताऱ्यात सभा घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या विरोधात देशात कुणी बोलत नाहीत. मात्र माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज असल्याने मी त्यांच्याविरोधात बोलणारचं असं राज ठाकरेंनी म्हटलं.


मुघलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला महाराष्ट्र होता, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या विरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र पुढे का नसेल? अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा सत्तेत आले तर तुमचं जगणं हराम करतील त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करु नका, असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केलं.


नरेंद्र मोदी आज सगळीकडे सभा घेऊन भारतीय सैनिकांच्या नावाने मत मागत आहेत. मात्र शहीद जवानांच्या नावाने मत मागायला लाज कशी वाटत नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत नसताना तत्कालीन मनमोहन सिंह यांना दहशतवाद्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत होते. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले. मात्र आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात?  दहशतवादी देशात घुसतात कुठून? तुमच्या हातात पूर्ण सत्ता आहे, मग पुलवामा हल्ला झालाच कसा, असे प्रश्न राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विचारले.


एका मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही. मोदींच्या याच वक्तव्यांचा आधार घेत पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? आमचे 40 मारले की काय? असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला.


काश्मीरमध्ये चेक पोस्ट मोडून घुसणाऱ्याला भारतीय सैनिकांनी गोळी मारली होती. त्यावेळी मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या होत्या. अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सैनिकांचं मनोबल खच्चीकरण केलं.


सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत स्टेजवर उभे होते. यावरुन जवानांबद्दल नरेंद्र मोंदीना किती आपुलकी आहे, हे दिसून येते, अशी टीका राज ठाकरेंनी केली.


राज ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे




  • निवडणूक लढवणार नसलो तरी अन्यायाविरुद्ध लढणारच, पाच वर्षात जे पूर्ण झालं नाही ते चव्हाट्यावर मांडणार : राज ठाकरे

  • थापा मारणाऱ्यांना चाप लावण्यासाठी व्हिडीओ क्लिप्स दाखवतो : राज ठाकरे

  • मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शाह तुमचं जगणं हराम करु शकतात : राज ठाकरे

  • नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत : राज ठाकरे

  • भाजपकडे वारेमाप पैसा कुठून आला? : राज ठाकरे

  • नोटबंदीने 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे : राज ठाकरे

  • सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या : राज ठाकरे

  • मोदींच्या धोरणामुळे काश्मिरींकडून जवानांवर आज हल्ले होत आहेत : राज ठाकरे

  • मोदी सत्तेत आल्यानंतर सर्वाधिक सैनिक शहीद झाले : राज ठाकरे

  • जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक आज अकलुजमधे नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर होते : राज ठाकरे

  • आज भारतात कोण पंतप्रधान हवं, हे पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतायेत. असं याआधी कधी झालं नाही : राज ठाकरे

  • पुलवामा हल्ला यांनीच घडवला की काय संशय येत आहे : राज ठाकरे