मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅश्टन टर्नरच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 'डक' स्कोअर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. टर्नर सलग पाच सामन्यांमध्ये भोपळाही न फोडता बाद झाला.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या टर्नरने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना हा लाजिरवाणा विक्रम रचला. 9 फेब्रुवारीला 26 वर्षीय टर्नरच्या दुर्दैवाचा फेरा सुरु झाला. बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्सकडून अॅडलेड स्ट्राईकर्सविरुद्ध खेळताना त्याने पहिला भोपळा मिळवला होता.
विझागमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टर्नरने दुसरा भोपळा रचला. पाच चेंडूंना सामोरा जाऊनही अॅश्टनला एकही धाव खेळता आली नाही.
यंदाच्या आयपीएलमध्ये टर्नरने तीन वेळा डक स्कोअर केले. आधी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तो एकही धाव न रचता तंबूत परतला. अशाप्रकारे टर्नरच्या खात्यात सलग पाच शून्य जमा झाली आहेत. त्यामुळे आता तो 'अर्धा डझन अंडी' मिळवण्याच्या मार्गावर आहे.
आयपीएलमध्ये सलग तीन 'डक' मिळवणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. अशोक दिंडा, राहुल शर्मा, गौतम गंभीर, पवन नेगी आणि शार्दुल ठाकूर यांच्या पंक्तीत तो विराजमान झाला आहे.
अॅश्टन टर्नरचं 'डक टेल्स', सलग पाच वेळा भोपळाही न फोडता बाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2019 11:56 PM (IST)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅश्टन टर्नर हा टी20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 'डक' स्कोअर करणारा पहिलाच फलंदाज ठरला, तर आयपीएलमध्ये सलग तीन 'डक' मिळवणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -