मुंबई : 'मोदी है तो मुमकीन है' म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावर आणलं. खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील काळाचौकीमध्ये राज ठाकरे यांनी सभा आयोजित केली.


'आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार भाजपने केला. अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?' असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. हरसाल या डिजीटल गावाची कथित पोलखोल केल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा भाजपवर खोट्या प्रचाराचा आरोप केला आहे.

मुकेश अंबानींनी मिलिंद देवरा म्हणजे काँग्रेसला दिलेला पाठिंबा हा दक्षिण मुंबईपुरता विषय नाही, हा देशव्यापी विषय आहे. मोदींची सत्ता जात असल्याचा मुकेश अंबानींनी देशाला दिलेला संदेश आहे, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला. यावेळी मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे जीवलग मित्र आहेत, हे सांगायला राज विसरले नाहीत.

VIDEO | राज ठाकरेंच्या मंचावर आलेल्या 'मोदी है तो मुमकीन है'मधील कुटुंबाशी बातचीत | मुंबई | एबीपी माझा



नोटबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा

सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात जो बोलतीय त्यांच्यावर ईडीच्या केसेस टाकल्या जात आहेत. त्यांचं तोंड बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी हे विसरु नये, तुम्ही देखील विरोधी पक्षात जाणार आहात. त्यावेळी तुमच्यावर देखील ईडीच्या केसेस पडतील. नोटबंदीची ज्यावेळी चौकशी होईल त्यावेळी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं समोर येईल, असा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.

मेक इन इंडियामध्ये कर्जाची आकडेवारी फुगवून सांगितली

भाजप सरकारने 'मेक इन इंडिया'चा गाजावाजा करून कर्जाचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. सरकारी यंत्रणांनी लोकांच्या कर्जाची आकडेवारी फुगवून खोटे एमओयू तयार केले. त्यानंतर हे खोटे आकडे लोकांसमोर ठेवल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

वैमानिक अमोल यादव यांनाही सरकारने खोटं आश्वासन दिलं. पालघरला 185 एकर जमीन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अमोल यादव यांना दिलं होतं. तसेच अमोल यादव यांच्या व्यवसायात मेक इन इंडियाच्या माध्यमातून 35 हजार कोटी रुपये गुंतवण्याचं आश्वासनही सरकारने दिलं होतं. मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्याने तेच अमोल यादव देश सोडून अमेरिकेला जात ही लाजिरवानी गोष्ट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.

VIDEO | मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझा