मुंबई : विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दोनवेळा आयपीएल जिंकणारी कोलकाता नाईट रायडर्स... या दोन्ही फौजा सज्ज झाल्या आहेत आयपीएलच्या नव्या मोसमातल्या आपल्या सलामीच्या लढाईसाठी. दोन संघांमधला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा आयपीएलच्या पहिल्या दहा मोसमांतला एक बलाढ्य संघ असला तरी विराटच्या फौजेला एकदाही ट्वेन्टी ट्वेन्टीचं महायुद्ध जिंकता आलेलं नाही. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिलं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानंच विराट आणि त्याचे शिलेदार मैदानात उतरतील. विराट आणि एबी डिव्हिलियर्स या दोन प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीवरच बंगलोरचं भवितव्य अवलंबून असेल.

आयपीएलच्या रणांगणात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटनं 149 सामन्यांत चार शतकं आणि 30 अर्धशतकांसह 4 हजार 418 धावांचा रतीब घातला आहे, तर डिव्हिलियर्सनही 148.17 च्या स्ट्राईक रेटनं 3 हजार 473 धावा फटकावल्या  आहेत.

2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेते ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला यंदा दिनेश कार्तिकच्या रुपानं नवा कर्णधार मिळाला आहे. गौतम गंभीरनंतर कार्तिक कर्णधारपदाची ही जबाबदारी कशी पार पाडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कार्तिकनं आजवरच्या आयपीएल कारकीर्दीत 152 सामन्यात 125.94 च्या स्ट्राईक रेटनं 2 हजार 903 धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिकसह यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकात्याच्या फलंदाजीची धुरा प्रामुख्यानं रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन आणि आंद्रे रसेल यांच्यावर राहिल. कोलकात्याच्या आक्रमणाची कमान सुनील नारायण, विनयकुमार आणि कुलदीप यादववर असेल.

आयपीएलच्या रणांगणात कोलकाता आणि बंगलोर आजवर 21 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात कोलकात्यानं 12 सामन्यांमध्ये, तर बंगलोरनं 9 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. आता ईडन गार्डन्सच्या लढाईत कुणाची सरशी होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.