मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत ताजी असतानाच आणखी एक राजकीय मुलाखत रंगणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात हा इतिहास घडणार आहे. मंगळवारी 10 एप्रिल रोजी मुंबईत ही मुलाखत होईल.

संजय राऊत आतापर्यंत शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपशी अटीतटीची लढाई करत आले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून अनेकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली जाते, मात्र यानिमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये वेगळाच 'सामना' रंगणार आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीही पहिल्यांदाच एखाद्या शिवसेना नेत्याला जाहीर मंचावर सामोरे जाणार आहेत.

संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे उत्सुकतेचा विषय ठरणार आहेत. एकीकडे 2019 निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न होत आहे, तर शिवसेनेने स्वबळाची तलवार उपसली आहे. त्यामुळे या मंचावर नेमकं काय होणार, हे पाहणं उत्कंठेचं ठरेल.