मुंबई : ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यात शनिवारी रात्री मोठा ट्रेन अपघात होता होता टळला. कारण, एक एक्स्प्रेस ट्रेन विनाइंजिन तब्बल 10 किमी धावली. या घटनेवेळी ट्रेनमध्ये प्रवासी देखील असल्याने, स्टेशनवर एकच गोंधळ सुरु होता.


अहमदाबाद ते पूरी एक्स्प्रेस टिटलागढमधून जात होती. ही ट्रेन टिटलागढ स्टेशनवर इंजिन बदलण्यासाठी थांबली असता, अचानक धावू लागली.  यानंतर स्टेशनवरील प्रवाशाकडून एकच गोंधळ सुरु झाला. ही सर्व घटना स्टेशनवरच्या एका प्रवशाने दुसऱ्या प्लेटफार्मवरुन आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली.

या व्हिडीओत सर्व प्रवासी घबरलेले दिसत आहेत, तर प्लेटफार्म वरील माणसे त्यांना ब्रेक लावण्यासाठी सांगत आहेत. अखेर स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रॅक वर दगड ठेऊन गाड़ीचे डबे थांबवले.

दरम्यान, ही घटना दोन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे घडल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनचे शटिंग करताना स्किड ब्रेक लावले नव्हते. (स्किड ब्रेकमुळे गाडीचे डबे जागीच थंबतात.)

या घटनेनंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी देखील सुरु आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून, जर वेळीच गाडी थांबली नसती, तर मोठा अनर्थ झाला असता.

घटनेचा थरारक व्हिडीओ पाहा